दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व

    Posted On November 12,2020

      
    नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा हॅपी दिवालीची कशी शुभ दीपावली होतेय ते! आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला पंचपक्वान्नांचे भोजन असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार वर्णन केलेला आहे. जसे की पृथ्वी महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. जल आणि आकाश मात्र गोल सांगितले असून अग्नीचा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  आपल्या आहारातील सहा रस पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.