Blog 
मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » समज-गैरसमज

मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » समज-गैरसमज

पाणी या विषयाच्या आजच्या तिसऱ्या भागात पाणी पिणे याविषयीचे समज-गैरसमज जाणून घेणार आहोत. परवा एका आयुर्वेदिक औषधालयामध्ये गेलो होतो. एक रुग्ण, मधुमेहासाठी पाणी पिण्याचा ग्लास आहे का, असे त्या दुकानदाराला विचारत होता. मी कुतूहलापोटी दुकानदार त्याला काय देतोय हे पाहत होतो. दुकानदाराने त्याला एक लाकडी ग्लास दिला. त्यात रोज रात्री झोपताना पाणी ओतून ठेवायला सांगितले व सकाळी या ग्लासातील पाणी पिण्यास सांगितले. असे महिनाभर केल्यास तुमच्या रक्तातील साखर कायमची पळून जाईल, असेही म्हणाला. मला तर काहीच समजले नाही. कारण आम्ही वैद्य ना. आम्हाला रुग्ण तपासून, निदान करून, द्रव्य निवडून चिकित्सा करता येते. असो. रुग्ण तेथून गेल्यावर हा काय प्रकार आहे हे मी त्याला विचारले. त्याने त्याला जांभळाच्या लाकडापासून बनवलेला ग्लास विकला होता. तो म्हणे फार चालतो मार्केटमध्ये. धन्य ते लोक आणि धन्य त्यांचे ते सल्लागार. उद्या हृद्रोगी रुग्णांसाठी अर्जुनाच्या झाडाचा, किडनीच्या रुग्णांसाठी वरुणसालीचा आणि मेंदूच्या रुग्णांसाठी बदाम, अक्रोड आदी झाडांपासून बनवलेले ग्लास बाजारात आले तर नवल वाटून घेऊ नका. पात्रसंस्कार हा आयुर्वेदात आहेच. त्यामुळे आपण कोणत्या भांडय़ात पाणी पितो त्याचे संस्कार त्या पाण्यावर होतातच. त्यामुळे अशा गोष्टींचा नक्की किती फायदा होईल हे सांगणे अवघड आहे, पण आयुर्वेदात पाणी पिण्यासाठी यांचा पात्र म्हणून उल्लेख नाही. म्हणून तर प्रथम सुवर्ण, मग रौप्य, मग ताम्र अशा पात्रात साठवलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. त्यांच्यातील विषघ्न गुणांमुळे जलशुद्धीकरण होत असे. मात्र आजकाल जाहिरातीतून वेगळ्याच प्रकारे माहिती देऊन प्रत्येक जण आपापल्या कंपनीचे वॉटर प्युरिफायर विकण्याच्या मागे लागले आहेत. पूर्वी तांब्याच्या भांडय़ाची जलशुद्धीकरण यंत्रे मिळायची. आजकाल महागडय़ा यंत्रांत चांदीचे प्लेटिंग केले आहे असे सांगून ते विकतात. तरी पण आयुर्वेदाला अपेक्षित असे जलशुद्धीकरण हे फक्त पाणी उकळल्यानेच होते. स्वच्छ पाणी वेगळे व र्निजतुक (शुद्ध) पाणी वेगळे. पाण्यातून तुरटी फिरवली तरी पाणी स्वच्छ होते. तुरटीमुळे काही प्रमाणात निर्जन्तुकही होते.  र्निजतुकीकरण करण्यासाठी पूर्वी पाण्यात इंजेक्शनची सुई बराच काळ उकळत ठेवली जात असे. म्हणजे पाणी अधिक काळ उकळले तरच र्निजतुक बनते. फक्त कोमट केलेल्या पाण्यातील जंतू मरत नाहीत. कोमट पाणी प्या, असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते उकळून कोमट केलेलेच अपेक्षित असते. फक्त कोमट केल्यास त्यातही दोष पटकन वाढतात. म्हणजे जसे विरजण लावण्यासाठी दूध कोमट करून घेतल्यास चांगले विरजण लागून चांगले दही तयार होते तसेच. म्हणून शक्य तेवढे पाणी नेहमी उकळून थोडे आटवून प्यावे. उकळलेले पाणीसुद्धा शिळे पिऊ नये.

समाजात पसरलेला आणखी एक गरसमज, की पाणी शिळे होत नाही. पाणी साठून राहिले की शिळे होते. खराब होते. आजकालच्या प्लास्टिक बंद बाटल्यांमधील पाणीसुद्धा काही महिन्यांनंतर खराब होते. त्यावरही तशी नोंद असते. शिळे पाणी पचायला जड असते व अनेक दोषवर्धकसुद्धा असते. या पृथ्वीतलावरती एकूण ७० टक्के पाणी आहे. आपल्या शरीरातही एकूण ७० ते ८० टक्के पाणी आहे. पाणी हे जीवन आहे. म्हणून फक्त पाणी पिऊनही माणूस कित्तेक दिवस जगू शकतो. म्हणजेच माणसाच्या जगण्यातील ८० टक्के वाटा पाण्याचाच आहे. पण आयुर्वेदाने जेवण करताना मात्र हा पाण्याचा वाटा फक्त २५ टक्केच असावा असे सांगितले आहे. आपल्याला आपल्या जठराचे चार भाग करण्यास सांगितले आहेत. त्यातील दोन भाग हे घन अन्न सेवन करावे. एक भाग पाण्यासाठी ठेवावा, तर एक भाग रिकामा म्हणजेच आकाश महाभूतासाठी ठेवावा. नेहमी ‘एक कोर कमी जेवावे’ असे जुने-जाणते लोक म्हणायचे. थोडक्यात, यालाच आपण मिक्सर म्हणू शकतो. आपण फळांचा ज्यूस बनविताना कधीही मिक्सर फक्त फळांनी किंवा पाण्याने गच्च भरत नाही. त्यात आपण निम्मी फळे टाकतो, थोडे पाणी टाकतो व वरचा काही भाग रिकामा ठेवतो. ज्यामुळे मिक्सर व्यवस्थित हलतो व घुसळण्याची प्रक्रिया चांगली होते. तसेच आपल्या जठरामध्ये अन्न घुसळण्याची प्रक्रिया होत असते. इथे पाणी प्रमाणातच हवे. घुसळायला मदत करेल एवढेच. म्हणून फक्त २५ टक्के. अधिक झाले की पचनशक्ती बिघडली म्हणून समजाच. लक्षात ठेवा, जेवणापूर्वी पाणी प्यायलो की माणूस कृश म्हणजे हडकुळा होतो. जेवणानंतर पाणी प्यायलो की माणूस जाड होतो. म्हणून जेवणाच्या मध्ये चार-सहा घासांनंतर दोन-दोन घोट फक्त पाणी प्यावे, ज्याने अन्न घुसळण्याची क्रिया छान होते.

You may also like