Blog 
मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » ढेकर

मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » ढेकर

मागच्या आठवडय़ात मी एका उपाहारगृहात दुपारी थोडा वेळ बसलो होतो.

मागच्या आठवडय़ात मी एका उपाहारगृहात दुपारी थोडा वेळ बसलो होतो. तेवढय़ात त्या ठिकाणी कॉलेजमधील चार पाच तरुण-तरुणी आले. एकामागून एक ते कोण काय पिणार? याबद्दल चर्चा करत थंड पेय मागवत होते. गंमत म्हणजे ते काय मागवत आहेत यापेक्षा ते घेण्यामागचं त्याचं कारण भन्नाट होतं. एक म्हणाला, मला पेप्सी प्यायची आहे, तर दुसरा कोकाकोला मागवत होता, कारण काय तर हे पेय प्यायल्यानंतर जे ढेकर येतात ते यास फार आवडतात म्हणून. उन्हाळा आहे. शरीरात थंडावा निर्माण करणारे काहीतरी प्यावे असा एकाचाही विचार या वेळी नव्हता. यात खरे म्हणजे ‘उद्गार’ अर्थात ‘ढेकर’ येणे हे प्राकृत आहे का विकृत हेच बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. आयुर्वेदात अन्नाचे पचन पूर्ण झाल्यानंतर ‘उद्गार शुद्धी’ हे लक्षण सांगितले आहे. यास आपण ‘प्राकृत ढेकर’ असे म्हणू शकतो. काहीजण ढेकर आला की आता ‘बास’. फार जेवण झाले असे म्हणतात. या ठिकाणी आहार जास्त घेतल्याने आपल्या जठरामध्ये वायूला जागा कमी पडते व तो वर सरकतो आणि ढेकर येतो, ही उद्गार शुद्धी नाही. हा फक्त ‘उद्गार’ मात्र हा व्याधी पण नाही. हे एक लक्षण आहे आता पोट पूर्ण भरलेले आहे याची जाणीव करून देणारे. अगदी पोटाला तडस लागेल इतका आहार करू नये. आपण एक कोर कमी खाऊन वायूला फिरता येईल एवढी जागा जठरात ठेवावी म्हणून हा ढेकर आला आहे. तर काहींना जेवण झाल्यानंतर काही वेळाने खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येतात. हे विकृत आहेत. हे अन्न पचन प्रक्रिया नीट होत नाही याचे द्योतक आहेत. हा कफज प्रकार असून बहुदा पाचक अग्नी मंद झाल्याने असे ढेकर येतात. काहींना तर करपट, आंबट, तिखट अशा स्वरूपाचे ढेकर येतात हेही सर्व ढेकराचे विकृत प्रकार समजावेत. यात पित्ताची विकृती अधिक असते. काहींना ढेकर नीट सुटत नाही. त्यामुळे नीट ढेकर नाही आला तर त्यांना छातीत जखडल्यासारखे होते, हृदयावर ताण येतो. काहींना क्वचित अजीर्ण झाल्यामुळे असा ढेकर आल्यास व तो अडकून बसल्यास हृदयावर ताण येऊन क्वचित प्रसंगी हार्ट अ‍ॅटक येऊन मृत्यू पण येतो. काही लोकांचे ढेकर सुटतानाचे आवाज ऐकून शेजारीपाजारी पण घाबरून जातात. हा ‘सशब्द’ ढेकर असतो, यात वाताची विकृती अधिक असते. काहींना पोट साफ झाले नाही की ढेकर सुरू होतात. काहींना सतत दिवसभर कोणत्याही कारणाशिवाय ढेकर येत असतात, काही ढेकर हे दुसऱ्या एखाद्या आजाराचे म्हणजे ग्रहणी वगैरेचे लक्षण म्हणून येतात. माझ्याकडे एक रुग्ण आले होते त्यांना गर्दीत गेले, कोणी हातात हात मिळवला अथवा साधे कोणी गमतीने जरी त्यांचे दंड दाबले तरी त्यांना ढेकर येत असे. या प्रकारात ‘मांसगतवात’ असे निदान करून औषधोपचार केल्याने त्यांना बरे वाटले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ढेकर ही काही गमतीने काढण्याची किंवा गमतीने येणारी गोष्ट नाही. त्यामागे मोठी कारणमीमांसा दडलेली असते. अनेक व्याधी असू शकतात. प्रसंगी ढेकर नीट न आल्याने मृत्यूसुद्धा येऊ शकतो. म्हणून उगीच गमतीने ढेकर काढत बसणे हेदेखील चुकीचे आहे. किंवा छान ढेकर येतात म्हणून कार्बन डाय वायू मिसळलेली पेय पिणेसुद्धा घातक आहे. तर बऱ्याचदा अ‍ॅसिडिटी वाढली की लोक लिंबू पाणी, सोडा, इनो अथवा जेलुसीलसारखी पित्तशामक औषधे घेतात. ही घेऊन ढेकर आला की त्यांना बरे वाटते व पित्तही कमी होते. जाहिरातीत पण तसेच दाखवतात. तरीही घरगुती उपायांमध्ये वरील ढेकरांच्या प्रकारांचे तारतम्य बाळगून कफज प्रकारात फक्त घोट घोट कोमट पाणी पीत राहावे, याने खाल्लेल्या अन्नाचे पचन होऊन पटकन बरे वाटते. ओवा, खाण्याचा सोडा घेतल्यानेही तत्काळ बरे वाटते. पित्तज प्रकारात थंड दूध, गुलकंद, प्रवाळ अथवा शंख भस्म मधातून घ्यावे. तर वाताज प्रकारात खाण्याचा सोडा, लिंबू पाणी, तूप अथवा पोट साफ करणारी औषधे घेतली की बरे वाटते.
लक्षात ठेवा या सर्व विकृत प्रकारात प्रथमत: आपली पचनशक्ती नीट करणे गरजेचे आहे. वैद्यांचा सल्ला घेऊनच योग्य ते औषधोपचार करावेत म्हणजे ढेकर कधीही ठोकर मारणार नाही.

You may also like