Blog 
मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मधुमेह

मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मधुमेह

आज भारताची वाटचाल मधुमेहाची राजधानी होण्याकडे चालू आहे.

आज भारताची वाटचाल मधुमेहाची राजधानी होण्याकडे चालू आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेले याचे प्रमाणसुद्धा विचार करायला लावणारे आहे. तर लहान मुलांमध्येसुद्धा आता मधुमेहाचा एक प्रकार आढळू लागला आहे. हा पूर्वी होता का? आताच याचे प्रमाण का वाढले? आणि महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदात यावर काही औषध आहे का? हे लोकांचे नेहमीचे प्रश्न. यातीलच बहुतांशी लोक रक्तातील साखर कमी करण्यासाठी लोकांनीच सांगितलेले वेगवेगळे घरगुती उपचार घेत राहतात आणि आयुर्वेदिक औषधे घेऊनही मधुमेहावर ताबा मिळत नाहीये असे म्हणतात. कारल्याचा रस, जांभळाचा रस, मेथीची पावडर, दुधी भोपळ्याचा अथवा कडुनिंबाच्या पाल्याचा रस हे त्यातील काही नेहमीचे ज्यूस. सकाळी फिरायला गेले की एक रस पिऊनच येतात. मला सांगा खरंच हा फक्त घरगुती उपचाराने बरा होणारा आजार आहे का?
एकच औषध आधुनिक शास्त्रातसुद्धा नाही जे सर्वाची रक्तशर्करा नियंत्रित ठेवेल. त्यांनासुद्धा आता प्रत्येक व्यक्तीचा मधुमेह वेगवेगळा तपासून वेगवेगळी औषधे व त्यांचा डोस नियंत्रित करावा लागतो. आणि आता पुन्हा एकदा एक नवीन संशोधन चालू आहे की जे या आजाराचा आणि रक्तातील साखरेचा काहीही संबंध नाही हे स्पष्ट करत आहे. म्हणजे आपण परत पूर्वीच्या आयुर्वेदातील निदान पद्धतीकडे जाणार आणि परदेशात यावर संशोधन होऊन ते परत आपल्याला त्याचे महत्त्व पटवून देणार. मात्र कदाचित त्या निदान पद्धतीचे नाव वेगळे असेल व त्यासाठी आपणास जास्त पैसेपण मोजावे लागू शकतात. मग नक्की काय आहे ही निदानाची पद्धत? तर मधु म्हणजे मधाप्रमाणे आणि मेह म्हणजे मूत्रप्रवृत्ती. ज्यांना मधाप्रमाणे मूत्रप्रवृत्ती आहे फक्त त्यांनाच मधुमेही असे म्हणता येते. मात्र आजकाल सर्वानाच रक्तात साखर आली की मधुमेही म्हणतात हे चुकीचे आहे. त्यातही आधुनिक शास्त्रात त्याचे फक्त प्रमुख दोनच प्रकार पडतात. आयुर्वेदात मात्र प्रमेहाचे वीस प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीने रुग्ण परीक्षण व मूत्र परीक्षण करून हे ठरवतात. उसाच्या रसाप्रमाणे लघवी होत असल्यास इक्षुमेह. इक्षु म्हणजे ऊस. असेच उदकमेह, कालमेह, नीलमेह, रक्तमेह, सारमेह, सांद्रमेह, मंजिष्ठामेह, हरिद्रामेह असे ज्या प्रमाणे मूत्रप्रवृत्ती तो मेह असे करत कफज दहा, पित्तज सहा व वाताचे चार असे एकूण वीस प्रकार आयुर्वेदात सांगितले आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम प्रत्येकाचेच लगेच मधुमेह हे निदान करणे चुकीचे आहे. दुसरे असे की यातील सर्व मेह लवकर चिकित्सा सुरू केली तर हमखास बरे होतात. त्यामुळे सर्वात शेवटी आयुर्वेदाकडे येण्याऐवजी प्रथम यावे.
कफज प्रकारातील दहा तर साध्यच आहेत. पित्तज याप्य तर वातज असाध्य आहे. आता मला सांगा एखाद्याला वातज प्रकारातील मेह आहे आणि त्याने जांभळाचा ज्यूस घेतला तर जांभूळ कषाय रसाचे असल्याने त्याचा मेह अजूनच वाढेल. कफज प्रकारात कडुनिंब, कारल्याचा रस यांचा चांगला उपयोग होईल, मात्र तेच पित्तज मेहास वाढवतील. म्हणून कोणतंही घरगुती औषध सेवन सुरू करण्यापूर्वी आपला प्रकार कोणता आहे याचे तज्ज्ञ वैद्यांकडून निदान करून घ्यावे. लक्षात ठेवा, प्रमेह हा प्रथम पचनसंस्थेचा आजार आहे. घेतलेले अन्न नीट पचन होत नाहीये म्हणून रक्तात साखर येत आहे किंवा लघवीचे प्रमाण वाढणे, तहान लागणे, भूक वाढूनही वजन कमी होणे ही लक्षणे दिसत आहेत. म्हणून प्रथम पचनसंस्था सुधारा. भूक लागली असेल तरच खा. अन्न चावून चावून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते व रक्तातील साखरही पटकन कमी होते हे आता सिद्ध झाले आहे. व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, चिंता, ताणतणाव, वेळी-अवेळी जेवण, रात्री-अपरात्री जेवणानंतर घेतलेल्या स्वीट डिशेस, दुपारी जेवणानंतर झोपणे हे सर्वप्रथम आपली पचनशक्ती बिघडवतात व नंतर न पचलेली अनावश्यक साखर रक्तात पडून राहते व आपले निदान मधुमेह होते आणि आयुष्यभराची औषधे मागे लागतात, कारण आग रामेश्वरी तर बंब सोमेश्वरी अशी चिकित्सा सुरू होते.

You may also like