Blog 
मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » बहुगुणी हळद

मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » बहुगुणी हळद

आजकाल अजिबात व्यसन नसणाऱ्यांनासुद्धा कर्करोग झालेला पहावयाला मिळतो.

सध्या भारतीयांमध्येसुद्धा कर्करोगच्या प्रमाणात लाक्षणिक वाढ झालेली दिसून येऊ लागली आहे. पूर्वी फक्त कोणतं न कोणतं व्यसन असणाऱ्यांना हा आजार होण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र आजकाल अजिबात व्यसन नसणाऱ्यांनासुद्धा कर्करोग झालेला पहावयाला मिळतो. सध्या कोणालाही कर्करोग होऊ शकतो. मध्यंतरीच्या काळात ‘हरित क्रांती’ व ‘धवल क्रांती’ झाली आणि भारतीय शेती व पशुपालन व्यवसायात आमूलाग्र बदल झाला. या क्रांतीमुळे पिकांची, दुधाची वाढ झाली. हायब्रीड बी-बियांमुळे धान्यांचे उत्पादन वाढले. पाश्चिमात्य देशांनी आपल्या पारंपरिक शेतीत या हरित क्रांतीच्या नावाखाली युरिया, पोटॅशियम इत्यादी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करावयास सुरुवात केली. आता हीच रसायने कर्करोगाचे जनक आहेत, हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले. खरं तर कोणतीही अनियमित वाढ म्हणजे कर्करोगच. जी या पिकांच्या व धान्यांच्या बाबतीत झाली तीच परिस्थिती ते अन्न खाणाऱ्या मनुष्यप्राण्याच्या बाबतीत होऊ लागली व पेशींच्या वाढीचे नियंत्रण सुटून ठरावीक पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागली. त्यामुळे कोणतेही व्यसन नसणारे, दारू, तंबाखू, सिगारेट न ओढणारे, फक्त फळभाज्या, पालेभाज्या असा शुद्ध सात्त्विक शाकाहार करणारेसुद्धा या कर्करोगाच्या विळख्यात येऊ लागले. त्यात भरीस भर पडली ती सध्याच्या फास्ट फूडमधील काही पदार्थाची, त्यात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या चायनीज सॉसची, तर प्लास्टिकसारख्या पात्रांचा आहारातील वाढलेल्या वापराची. साधं एखाद्या प्लास्टिकच्या चहाच्या प्यालातून चहा पिऊन पहा. प्याल्याच्या आतल्या बाजूला एक पातळ मेणाचा थर असतो जो चहा ओतताच चहावर येतो. हलक्या दर्जाच्या प्लास्टिकच्या बाटलीत जास्त वेळ पाणी राहिले तरी त्याची चव बदलते. म्हणजेच त्यातील शरीराला घातक असे घटक पाण्यात मिसळतात. एवढेच काय पण नुकतंच एका प्रसिद्ध कंपनीच्या बेबी पावडरमध्येही कर्करोग निर्माण करू शकणारे घटक आढळल्याने, त्यांना ही कित्येक कोटींच्या दंडाला सामोरे जावे लागले.
एवढे सर्व असूनही पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतीयांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण त्या मानाने अजून कमीच का आहे? हे शोधण्यासाठी पाश्चिमात्य लोकांनी एक सव्‍‌र्हे केला असं ऐकण्यात आलं होतं आणि या सव्‍‌र्हेमध्ये असे निदर्शनास आले की, भारतीयांच्या रोजच्या आहारामध्ये असा कोणता तरी पदार्थ असला पाहिजे ज्याचा ते रोज सेवन करत आहेत आणि तो कर्करोग विरोधी आहे. मात्र गम्मत म्हणजे परंपरेने वापरत असल्या कारणाने भारतीयांना तो माहीतही नाही. या पदार्थामुळेच भारतीयांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी आहे, हे सिद्ध झालं होतं. मग अथक प्रयत्नांनंतर एकदाचा तो पदार्थ त्यांनी शोधून काढला आणि तो पदार्थ म्हणजे भारतीयांच्या स्वयंपाकघराची आणि गृहिणींची जीव की प्राण अशी ‘हळद’! या हळदीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारी, रोखणारी तत्त्वे असल्यानेच हिच्या नियमित सेवनाने कर्करोगावर मात करता येऊ शकते, असं लक्षात आलं. मग ही सर्व पाश्चिमात्य मंडळी त्या हळदीपासून कर्करोगावरील औषधे तयार करू लागली व हळदीचे पेटंट घेण्याच्याही मागे लागली. मात्र त्यांचा हा ‘पेटंट’चा डाव काही साध्य झाला नाही.
पूर्वीपासून अगदी पाय मुरगळला, जखम झाली, ताप कणकण आली की सर्वाच्या घरात लगेच प्रथम हळद वापरली जायची. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत खोकला आला की, हळद दूध ठरलेलंच. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण सामथ्र्य या हळदीत आहे. आपल्याच परंपरेत, मसाल्यामध्येच एवढा मोठा आरोग्याचा साठा दडलाय, की जो आपणास कित्येक वर्षे कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून वाचवत आहे हे आपल्यालाच माहीत नाही हे आपले दुर्दैव. याबाबत आपल्या आयुर्वेदाचे ऋषी-मुनींचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कारण त्यांच्यामुळेच कळत नकळत आपल्या आरोग्याचे अजूनही रक्षण होत आहे. मात्र आता आपणच यापासून दूर चाललो आहोत आणि नको नको ते आजार ओढवून घेत आहोत.

You may also like