Blog 
मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » शीतपित्त

मुखपृष्ठ » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » शीतपित्त

पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात.

पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. सुरवंट अंगावरून फिरल्यावर जशा गाठी उठतात तशाच या गाठी असतात. खाजसुद्धा भरपूर असते. काही जणांना तर फक्त पाण्याशी किंवा थंड हवेशी संपर्क आला की जेवढय़ा उघडय़ा अंगाचा, हाताचा, पायाचा संपर्क आला असेल तेवढय़ाच भागावर या गाठी उठतात.
एक रुग्ण तर माझ्याकडे असे आहेत की ज्यांना सकाळी थंड पाण्याच्या नळाखाली हात धुतले की लगेच या गाठी उठायला सुरुवात होतात. काही जणांना तर या कशाने उठतात हेच समजत नाही. फार त्रास होत नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात, तर काहींना या गाठी उठल्या की काहीच सुचत नाही. खाज एवढी असते की, सर्व कामे बाजूला ठेवून फक्त काही ना काही यावर लावत बसावे लागते. मग काही काळाने या गाठी कमी होतात. यातील बहुतांशी लोक अंगावर गाठी उठून खाज सुरू झाली की एक सेट्रीझिन नावाची गोळी घेतात. याने खाज थांबते, पण झोप जास्त लागते. दिवसभर गुंगी आल्यासारखे वाटते आणि तात्पुरते बरे वाटते; पण याचे दीर्घकालीन दुष्परिणामही अधिक आहेत. मात्र याच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त लागते. क्वचित उतारवयामध्ये विस्मरणाचा धोका वाढतो. म्हणून या आजारावर अशा गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे. हा कशामुळे होतो हे समजून घेतले पाहिजे.
आधुनिक शास्त्रात याचे Urticarial असे नामकरण केले आहे, तर आयुर्वेदात याचे ‘शीतपित्त’ असे फार सुरेख वर्णन केले आहे. कित्येक लोक हा आजार कोणत्या तरी गोष्टीची अ‍ॅलर्जी असल्याने आला असेल म्हणून सर्व टेस्ट करून घेतात; पण गंमत म्हणजे आयुर्वेदानुसार यात शीतगुणाने वाढलेला वात या कारणाने बिघडलेल्या पित्ताला कोठय़ातून शाखेत खेचून आणतो व सर्वागावर गाठी उत्पन्न करतो असे वर्णन आहे. याचे खाज येणे, न येणे, गाठेची कडा जाड असणे, मधेच खड्डा पडणे असे अनेक छोटे छोटे प्रकार पडतात.
या प्रत्येक प्रकारात अन्य दोषांचा समावेश असतो. त्यामुळे चिकित्सेचे तत्त्वसुद्धा बदलते. म्हणून सर्वात प्रथम आपण योग्य वैद्याकडे जाऊन आपले निदान करून याचे उपचार सुरू करावेत. म्हणजे या त्रासापासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. थंड पदार्थाचे सेवन, थंड वारा, थंड पाण्याचा संपर्क यामुळे हा आजार उद्भवतो, तर त्याचबरोबर काही जणांना गवार, शेवगा, वांगी, फरसाण, हरभरा डाळीचे पदार्थ खाण्यात आले की याचा उद्भव जाणवतो. क्वचित मांसाहार अथवा उष्ण व मसालेदार, तिखट भाज्या खाण्यात आल्या तरी याचा त्रास जाणवतो.
यासाठी आज्जीबाईच्या बटव्यातील काही उपचार तत्काळ लागू पडतात, याने लगेच बरे वाटते. यामध्ये कांद्याचा रस सर्वागाला लावणे, कोथिंबिरीचा रस व किसलेले ओल्या नारळाचे खोबरे एकत्र करून लावणे, खोबरेल तेल कोमट करून सर्वागाला लावणे याने लगेच बरे वाटते; पण लक्षात ठेवा, हे फक्त आयुर्वेदिक तात्पुरते उपचार आहेत. कायमस्वरूपी हा आजार बरा करण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार व वमन, विरेचन, बस्ती व रक्तमोक्षण इत्यादी पंचकर्म शास्त्रोक्त पद्धतीने करून घेणे गरजेचे आहे. हा आजार दिसायला साधा दिसत असला तरी काही लोकांना मात्र याने फार हैराण केले आहे. त्यांचे आनंदी जीवनच हिरावून घेतले आहे आणि तात्पुरत्या उपचारांना बळी पडून त्यांना भविष्यकालीन मोठमोठय़ा आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
आपण यांना वेळीच योग्य उपचारांची माहिती देऊन या त्रासातून त्यांची सुटका करून देऊ शकतो. गरज आहे ती फक्त आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी या आजारावर सांगितलेल्या उपचारांची माहिती करून घेण्याची. एखाद्या प्रगत गणल्या जाणाऱ्या शास्त्रात यावर काही उपाय नाही म्हणजे अन्य शास्त्रांतसुद्धा यावर उपचार नाही असे होत नाही. शास्त्र बदलले की त्याची आजाराकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणून सेकंड ओपिनिअन हे नेहमी सेकंड पॅथीमधील असावे. एकाच पॅथीच्या दोन लोकांचे निदान हे बहुधा एकसारखेच येते.

You may also like